Entertainment

ऍक्शनचा तडका असलेला ‘फेमस’ चित्रपट येतोय लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

Share Post

काही चित्रपटांमध्ये अनेक कलाकार हिरो असतात, विशेषतः ऍक्शनपटात ही बाब अधिक आढळून येते. अशातच भर घालत ‘गवसाने प्रॉडक्शन हाऊस’ आणि ‘गायकवाड सन्स प्रॉडक्शन हाऊस’ प्रस्तुत तसेच ‘ए. जी प्रॉडक्शन हाऊस’ यांच्या संयुक्त विद्यमाने दिग्दर्शक अक्षय नागनाथ गवसाने दिग्दर्शित ‘फेमस’ हा नवाकोरा ऍक्शन आणि रोमँटिक चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. निर्माते मनोज गवळी, आशिष गुंजेकर, महेश संजय गायकवाड, अंकित बजाज, अक्षय नागनाथ गवसाने यांनी चित्रपटाच्या निर्मितीची धुरा पेलवली असून या चित्रपटात अभिनेता महेश गायकवाड आणि स्वरूप सावंत मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. नुकत्याच लाँच झालेल्या ‘फेमस’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये असे पाहायला मिळतंय की, दोन प्रमुख अभिनेत्यांमध्ये एक नायिका उभी आहे. अर्थात पोस्टर पाहून असा अंदाज वर्तविण्यात येत आहे की नायिकेसाठीची मुख्य कलाकारांची धडपड डोळ्यासमोर स्पष्ट दिसतेय. आता मात्र ही पाठमोरी नायिका कोण आहे याचा प्रत्येकजण तर्कवितर्क लावतोय. चित्रपटातील मुख्य नायिकेची झलक पाहण्यासाठी आता साऱ्यांचीच उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे आणि ही उत्सुकता आणखी काही दिवस अशीच राहणार आहे कारण चित्रपटातील मुख्य नायिका प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास काही क्षणाचा अवलंब आहे. तर महेश आणि स्वरूप यांच्यात नायिकेला कोण मिळवणार ही चुरशीची लढाई चित्रपटात पाहणंही रंजक ठरेल. तर या चित्रपटात मेघा शिंदे, साक्षी जाधव, प्रदीप शिंदे, विवेक यादव या कलाकारांना पाहणं रंजक ठरणार आहे. तर चित्रपटात बालकलाकार म्हणून शौर्य प्रदीप चाकणकर आणि श्रीतेज प्रसाद चाकणकर यांनी चांगलीच धमाल केलीय.चित्रपटाबाबत बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते अक्षय नागनाथ गवसाने असे म्हणाले की, “चित्रपटसृष्टी आणि आमचं अगदी जवळचं नातं आहे. कारण चित्रपटसृष्टीत आमचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे, त्यामुळे चित्रपट निर्मिती करताना कोणत्या अडचणी येतात, चित्रपट कसा बनतो हे आम्ही अगदी जवळून पाहिलं होतं. दरम्यान कॅटरिंगचे काम करताना पडद्यामागील तांत्रिक गोष्टी आवड म्हणून शिकत ही होतो. त्यावेळी मनात मी एक निश्चय केला की, एक दिवस आपण ही चित्रपटाची निर्मिती करायची. आणि अखेर आज तो दिवस आलाय, वडिलांना आणि घरच्यांना दिलेला शब्द आज पूर्ण होतोय, हा चित्रपट निखळ मनोरंजन आणि ऍक्शन थ्रिलरने भरलेला आहे. तुम्हा रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद फक्त पाठीशी ठेवा.”तर चित्रपटाचा मुख्य नायक महेश गायकवाड या चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल टाकण्यास सज्ज झाला आहे, याबाबत बोलताना तो असे म्हणाला की, “चित्रपटात काम करणं आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मायेची थाप मिळवणं, त्यांच्याकडून आशीर्वाद मिळवणं हे प्रत्येक अभिनेत्याच स्वप्न असतं, असंच स्वप्न माझंही आहे. मला मुळात अभिनयाची आवड नव्हती मात्र माझे बरेच मित्र हे चित्रपटसृष्टीतले आहेत, त्यांच्या सान्निध्यात राहून मी कधी चित्रपटसृष्टीच्या, अभिनयाच्या जवळ गेलो माझं मलाच कळलं नाही. अभिनयाची आवड निर्माण होताच मी अभिनयाचे धडे घेतले. आणि मी अभिनेता म्हणून तुमच्या समोर उभा आहे. माझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण झालंय. तुम्ही मायबाप माझ्यावर प्रेम करून मला सांभाळून घ्याल हे नक्कीच.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *