उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवसापासूनच पुणेकरांचा भिमथडीत ओढा
भीमथडी सिलेक्ट दालनात विविध राज्यांमधील स्टॉल असून त्यामध्ये महाराष्ट्रासह विविध राज्यातील महिला बचत गटाच्या व त्या ठिकाणची संस्कृती जपणाऱ्या विविध वस्तू पुणेकरांना आकर्षून घेताना दिसत होत्या. राजस्थान, आसाम, उत्तर प्रदेश, गोवा, पश्चिम बंगाल, दिल्ली, ओडिशा, तेलंगणा, मध्य प्रदेश, कर्नाटका आदी 11 राज्यातील,हस्तकलेच्या माध्यमातून बनविलेल्या विवध उपयोगी वस्तुंना पुणेकरांनी पसंती दिली. त्यामध्ये बांबू काम, ज्वेलरी, खणकाम , टाकाऊ प्लास्टिक मटेरियल पासून बनविलेल्या बॅगा, एम्ब्रॉयडरी, बांबूच्या फ्याब्रिक पासून बाळाचा दुपट्टा, वेस्ट बंगालचा हॅन्डमेड कांता स्टिच , सिल्क कॉटन फ्राब्रिक, फेमस हँडलूमस, राजस्थानी पारंपरिक पेंटिंग, असामची ग्लास बेस ज्वेलरी, तेलंगणाच्या एकत कॉटनचे विविध प्रकार , राजस्थानचे मलमल कॉटन वर्क, दिल्लीचे हॅन्ड ब्लॉक नॅचरल डाय, इत्यादी. विविध प्रकारच्या कलाकारी भीमथडी सिलेक्ट मध्ये पहावयास मिळत आहेत. शुक्रवार असल्याने नेहमी प्रमाणे पुणेकरांनी व्हेज नॉन व्हेज वर मनसोक्त ताव मारला.
भीमथडीतील पर्यावरण पूरक देवराई घेते पुणेकरांचे लक्ष वेधून
भीमथडीत देवराईमध्ये सुमारे 120 प्रकारच्या देशी वृक्षांची लागवड केली आहे. देवराईमुळे देशी वृक्षांचे मुबलक बीज तयार होते. देवराई मुळे गावागावात ऑक्सिजन बँक, निसर्गातील विविध परीसंस्थाना संरक्षण, निसर्गाचा समतोल, किडे मुंग्या यांना आश्रय व खाद्य, शेती उत्पनात वाढ असे विविधांगी फायदे मिळतात. झाडांचे हेच महत्व ओळखून कर्जत जामखेडचे आमदार मा.रोहित दादा पवार यांनी मागील काही वर्षात कर्जत जामखेडमध्ये जवळपास दीड लाख रोपे लावली असून त्याची गावाप्रमाणे व वृक्षाप्रमाणे माहिती या भीमथडीत आपल्याला पाहायला मिळेल.
दरम्यान आज भीमथडीच्या दुसऱ्या दिवशी मा. आमदार रोहित पवार, मा. आमन झेंडे- डी सी पी क्राईम पुणे,
पुणे व परिसरातील विविध शाळा व व्यवस्थानशास्त्र शिकणारे विद्यार्थी आदींनी भीमथडीला भेटी दिल्या.
भीमथडीतील मार्केटिंग शिकण्यासाठी बंगलोरमधील महिलांचा पुणे प्रवास
भीमथडीच्या माध्यमातून बचत गटातील महिलांची झालेली भरभराट आता जगभरात पोहचली आहे. याचाच अभ्यास करण्यासाठी कर्नाटकातील महिलांचा कृषी व कृषी पूरक उद्योग अभ्यास दौरा आयोजित केला होता.
या माध्यमातून ता. अनकेल जिल्हा बंगलोर येथील बचत गटाच्या 23 महिला भीमथडीतील मार्केटिंग, ब्रँडिंग, पॅकेजिंग, ग्रेडिंग आदी कौशल्य शिकण्यासाठी येथे आल्या आहेत. त्या फुल शेती, मसाले, भरडधान्य, दूध व दुग्धजन्य पदार्थ यावर काम करणार असून या महिला महाराष्ट्रातील महिलांशी संवाद साधताना दिसत होत्या. हेतू समान असल्यामुळे या वेळी भाषेची अडचण फारशी अडथळा ठरत नव्हती.
दिनांक 25 डिसेंबर पर्यंत सकाळी 10.00 ते सायंकाळी 10.00 वाजेपर्यंत चालणाऱ्या भीमथडी जत्रेला पुणेकरांनी आवर्जून भेट द्यावी असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात येत आहे.