20/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

‘उगवते तारे’ व ‘इंद्रधनू’चा रौप्य महोत्सव ३०० बाल व युवा कलाकारांचा सहभाग

Share Post

३४ व्या पुणे फेस्टिव्हलमधील ‘उगवते तारे’ व ‘इंद्रधनू’ यामध्ये यंदा ३०० हून अधिक बाल व युवाकलाकारांनी सहभाग घेतला आहे. मंगळवार ६ सप्टे. व बुधवार ७ सप्टे. या दोन दिवशी सायं. ५ ते ८ या वेळेत घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन,पुणे  येथे अनुक्रमे उगवते तारे व इंद्रधनू कार्यक्रम संपन्न होतील. याचे उद्घाटन सायं ५ वाजता , ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना आणि नृत्यगुरू डॉ. स्वाती दैठणकर करतील. अशी माहिती उगवते तारे व इंद्रधनुचे संयोजक रवींद्र दुर्वे यांनी दिली .

यामध्ये ५ ते १५ वर्षे वयोगटातील उगवत्या कलाकारांसाठी ‘उगवते तारे’ आणि १६ ते २५ वर्षे वयोगटासाठी ‘इंद्रधनू’ कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी होते. यंदा या उपक्रमाचे २५वे वर्ष आहे.

यंदा यामध्ये शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्यामध्ये ; कथक, भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, कथकली, कुचीपुडी व ओडिसी नृत्य तसेच तबला, बासरी, हार्मोनियम, गिटार, व्हायोलीन, सतार, सरोद, कीबोर्ड वादन, नकला, एकपात्री  प्रयोग, जादूचे प्रयोग, पोवाडे, भावगीत, भक्तीगीत, चित्रपटगीते, सुगम संगीत, पाश्चिमात्य नृत्य अशा वैविध्यपूर्ण कला बाल व युवा कलाकार यामध्ये सादर करतील .

पुणे फेस्टिव्हलच्या ‘उगवते तारे’ व ‘इंद्रधनू’मध्ये सहभागी अनेक बाल व युवा कलावंत पुढे राष्ट्रीय पातळीवर विविध महोत्सवांमध्ये आणि राष्ट्रीय व प्रादेशिक टी.व्हि. चॅनल्सवर चमकले त्यामध्ये शास्त्रीय गायक पं. संजीव अभ्यंकर, नृत्यांगना शर्वरी जेमिनीस, नृत्यांगना शेफाली लाहोटी, गायिका बेला शेंडे, गायिका सावनी शेंडे, नृत्यांगना व नृत्य दिग्दर्शिका  तेजश्री अडीगे, नृत्य दिग्दर्शिका निकिता मोघे अशा अनेक कलावंतांचा समावेश आहे. एकप्रकारे हा टॅलेंट सर्च आहे , असे संयोजक रवींद्र दुर्वे यांनी शेवटी सांगितले.

पुणे फेस्टिव्हलचे मुख्यप्रायोजक कोहिनूर ग्रुप असून उपप्रायोजक जमनालाल बजाज फाउंडेशन,नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी,सिस्का आणि सहप्रायोजक भारत फोर्ज व पंचशील आहेत.उगवते तारे व इंद्रधनुचे प्रयोजक मराठी बांधकाम व्यावसयिक संघटना व गेरा डेवेलोपमेंट प्रा.लि हे आहेत.