इंडियन ऑइल UTT सीझन ४ मध्ये पदार्पण करणाऱ्या बंगळुरू स्मॅशर्स संघाच्या जर्सीचे अनावरण
इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ मध्ये पदार्पणातच आपली छाप पाडण्यासाठी बंगळुरू स्मॅशर्स संघाने कंबर कसली आहे. १३ जुलै पासून सुरू होणाऱ्या या लीगसाठी बंगळुरू स्मॅशर्सने आपल्या जर्सीचे आज पुण्यात अनावरण केले. संघाचे मालक पुनित बालन यांच्यासह भारताची स्टार खेळाडू मनिका बात्रा, प्रशिक्षक सचिन शेट्टी (भारत) आणि वेस्ना ओजस्टरसेक (स्लोव्हेनिया) यांच्यासोबत संपूर्ण स्मॅशर्स संघ जर्सी अनावरणाच्या कार्यक्रमात उपस्थित होते.
पुण्यात संपूर्ण संघाचे स्वागत करताना पुनित बालन ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पुनित बालन यांनी सांगितले की, “UTT लीगचा भाग असल्यामुळे आम्हाला टेबल टेनिसला सपोर्ट करण्याची आणि हा खेळ पुढील स्तरावर घेऊन जाण्यासाठी संधी मिळाली आहे. भारतीय खेळ आणि खेळाडूंच्या पाठीशी उभे राहणे, त्यांच्या प्रवासात योगदान देणे, त्यांची स्वप्ने साकार करणे, भारतासाठी ऑलिम्पिक आणि इतर पदके जिंकणे हा नेहमीच आमचा दृष्टीकोन राहिला आहे. इंडियन ऑइल UTT आणि बंगळुरू स्मॅशर्ससह केवळ बंगळुरूमध्येच नव्हे, तर संपूर्ण देशात टेबल टेनिस खेळण्यास अधिक क्रीडाप्रेमींना प्रेरित करू, अशी आम्हाला आशा आहे. बंगळुरू स्मॅशर्स स्पर्धेत चांगली कामगिरी करतील, अशी मला खात्री आहे.”
देशातील अव्वल दर्जाची खेळाडू आणि खेलरत्न पुरस्कार विजेती मनिका बात्रा, कझाकस्तानमधील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आणि ऑलिम्पियन किरील गेरासिमेन्को, ऑलिम्पियन आणि युरोपियन सांघिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेती पोलंडची नतालिया बॅजोर परदेशी खेळाडूंसह अनुभवी सनील शेट्टी आणि पोयमंती बैस्या व जीत चंद्रा या युवा खेळाडूंसह हा संघ परिपूर्ण झाला आहे.
“ही केवळ बंगळुरू स्मॅशर्ससाठीच नाही तर आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची स्पर्धा आहे. आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी इंडियन ऑईल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ हे परिपूर्ण व्यासपीठ आहे आणि मी बंगळुरू स्मॅशर्ससाठी माझे सर्वोत्तम देण्याच्या प्रतीक्षेत आहे,” असे जागतिक क्रमवारीत ३५व्या क्रमांकावर असलेल्या मनिका बात्राने जर्सी अनावरणाच्या कार्यक्रमात म्हटले.
बंगळुरू स्मॅशर्सचे प्रशिक्षक सचिन शेट्टी म्हणाले, “संघ चांगला आणि ताजातवाना दिसत आहे. खेळाडू एकत्रित चांगला खेळ करण्यासाठी उत्सुक आहेत. आमची नुकतीच भेट झाली असली तरी, खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफमध्ये चांगले संबंध निर्माण आहेत. आम्ही एक संघ म्हणून तिथे जाऊ आणि प्रत्येक सामना जिंकण्याचा प्रयत्न करू. उद्यापासून आम्ही मोहिमेला सुरुवात करत असताना संघ आपले सर्वोत्तम देईल.”
सीझन ४ शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे १३ ते ३० जुलै २०२३ दरम्यान खेळवली जाईल. स्पोर्ट्स १८ आणि JioCinema वर लीगचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.