इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ गुरूवारपासून
हाय व्होल्टेज टेबल टेनिस सामन्यांसाठी व्यासपीठ सज्ज झालं आहे. इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ ला गुरूवारपासून पुण्यातील महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरुवात होत आहे.
टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया (TTFI) च्या संयुक्त विद्यमाने निरज बजाज आणि विटा दाणी यांनी २०१७मध्ये ही फ्रँचायझी लीग प्रमोट केली. ही लीग भारतीय टेबल टेनिससाठी गेम चेंजर ठरली आहे आणि चौथ्या हंगामातही लीग यश मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.
इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ मध्ये १२ आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह एकूण ३६ खेळाडू १८ दिवसांच्या कालावधीत रोमांचकारी खेळ खेळतील. एकूण ३६ खेळाडूंपैकी १४ ऑलिम्पिकमध्ये खेळले आहेत, तर नऊ खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेत आपले सामर्थ्य दाखवले आहे.
गतविजेता चेन्नई लायन्स ३० जुलैपर्यंत चालणाऱ्या सीझन ४च्या पहिल्या सामन्यात पुणेरी पलटण टेबल टेनिस संघाविरुद्ध जेतेपदाच्या बचावाची सुरुवात करतील. भारताचा स्टार खेळाडू अचंता शरथ कमल याच्या नेतृत्वाखाली चेन्नई लायन्स खेळणार आहे. या दोन संघांसह सीझन ४ च्या जेतेपदासाठी बंगळुरू स्मॅशर्स, दबंग दिल्ली टीटीसी, गोवा चॅलेंजर्स आणि यू मुंबा टीटी हे संघ जेतेपदासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसतील.