“आपलं पुणे सायक्लोथॉन” स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची सेलिब्रिटी प्रोमो राईडद्वारे मोठ्या उत्साहात घोषणा
पुनीत बालन ग्रुप प्रायोजित व IPS अधिकारी कृष्ण प्रकाश यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली तसेच फिनोलेक्स पाईप्सच्या सयुंक्त विद्यमाने ५ मार्च २०२३ रोजी होणाऱ्या “आपलं पुणे सायक्लोथॉन” स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा कृषी महाविद्यालय मैदान, पुणे येथे करण्यात आली. त्यानिमित्त या स्पर्धेची पुणेकरांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी रविवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेली “सेलिब्रिटी प्रोमो राईड” मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाला पुनीत बालन, कृष्ण प्रकाश, रवींद्र वाणी, प्रविण तरडे, अमेय वाघ, वैदेही परशुरामी, महेश लिमये, सुनील अभ्यंकर, विनोद सातव, जयेश संघवी, भूषण वाणी, यश रायकर, सुषमा कोप्पीकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची उपस्थिती लाभली. तर १५० पेक्षा जास्त सायकलप्रेमींनी आपला सहभाग नोंदवला आणि सुरक्षेचे सर्व नियम पाळून आयोजित करण्यात आलेली “सेलिब्रिटी प्रोमो राईड” यशस्वी केली. याप्रसंगी बोलताना पुनीत बालन म्हणाले “आम्ही विविध क्रीडाक्षेत्रातील खेळाडूंना आणि स्पर्धांना कायमच प्रोत्साहन व आर्थिक पाठबळ देत आलो आहोत. मी स्वतः एक खेळाडू असल्याने बऱ्याचशा क्रीडाप्रकारांना वयाचे बंधन असते पण सायकलिंगला मात्र कोणत्याच वयाचे बंधन नाही असे मला वाटते, त्यामुळेच आम्ही “आपलं पुणे सायक्लोथॉन” स्पर्धेचे मुख्य प्रायोजक होण्याचा निर्णय घेतला.” तसेच फक्त यावर्षीच नाही तर पुढील ५ वर्षे आम्ही या स्पर्धेच्या मागे भक्कम उभे राहू अशी मोठी घोषणाही त्यांनी केली. IPS अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत शेरोशायरी आणि जोशपूर्ण घोषणांचा समावेश असलेले आपले मनोगत व्यक्त करताना “आपलं पुणे सायक्लोथॉन” द्वारे पुण्याला पुन्हा एकदा सायकलींचे शहर अशी ओळख निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. “पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन” ही जशी पुण्याची ओळख आहे तशीच “आपलं पुणे सायक्लोथॉन” सुद्धा पुण्याची एक ओळख व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्यासाठी जास्तीतजास्त पुणेकरांनी या स्पर्धेत सहभागी झाले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. चॅम्प एन्ड्युरन्सचे रवींद्र वाणी, अभिनेते प्रविण तरडे, सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक महेश लिमये यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या तर अमेय वाघ, वैदेही परशुरामी यांनी त्यांच्या आगामी “जग्गू आणि जुलिएट” या चित्रपटातील “भावी आमदार” या गाण्यावर नृत्य करून उपस्थित सायकलप्रेमींमध्ये जोश निर्माण केला. याप्रसंगी १९४५ सालापासून सुरु झालेली आणि “घाटाचा राजा” या किताबासाठी प्रसिद्ध असलेली सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि क्रीडा जागृती आयोजित मुंबई – पुणे सायकल रेसची घोषणासुद्धा करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद सातव यांनी केले. सकाळी ७:३० वा. कृषी महाविद्यालय मैदान येथून सुरु झालेली “सेलिब्रिटी प्रोमो राईड” जंगली महाराज रोडमार्गे गेली व गुडलक जवळील कलाकार कट्टा येथे थोडावेळ थांबून घोषणा दिल्या गेल्या आणि फर्ग्युसन कॉलेज रोडमार्गे पुन्हा कृषी महाविद्यालय मैदान येथे त्याची सांगता झाली. आयोजक, प्रायोजक, कलाकार आणि उपस्थित सर्व मान्यवर यांच्यासह सुमारे १५० पेक्षा जास्त सायकलप्रेमींनी ही राईड सायकल चालवत उत्साहात पूर्ण केली. “आपलं पुणे सायक्लोथॉन” स्पर्धेचे दुसरे पर्व रविवार, ५ मार्च २०२३ रोजी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात आले असून १०, २५, ५० व १०० किलोमीटर अशा ४ अंतरांसाठी ही स्पर्धा असणार आहे. १० किलोमीटर स्पर्धेचे नाव जॉय राईड असून ती सर्वांसाठी खुली आहे तर स्त्रियांच्या २५ किलोमीटर स्पर्धेचे नाव पिंक पेडलिंग असे आहे तसेच पुरुषांसाठी २५, ५० व १०० किलोमीटर अशा ३ वेगवेगळ्या स्पर्धा असणार आहेत. या स्पर्धेसाठी अंतराप्रमाणे रुपये ९९९ ते १९९९ इतके शुल्क असणार आहे. या स्पर्धेसाठी www.champendurance.com या बेवसाईटवर जाऊन आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रत्येक स्पर्धकास सायकलिंग जर्सी, स्लिंग बॅग, आकर्षक बक्षिसे व स्पर्धेदरम्यान हायड्रेशन सपोर्ट मिळणार आहे तसेच यशस्वीपणे अंतर पार करणाऱ्या स्पर्धकांना फिनिशर्स मेडल्स सुद्धा मिळणार आहेत. १० किलोमीटर अंतरांव्यतिरिक्त इतर सर्व स्पर्धकांना कस्टमाइज्ड BIB आणि टाईमिंग चिप देण्याचेही संयोजकांनी ठरवले आहे.फिनोलेक्स पाईप्स यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडणाऱ्या “आपलं पुणे सायक्लोथॉन” स्पर्धेचे मुख्य प्रायोजक पुनीत बालन ग्रुप असून भारतातील आघाडीची राष्ट्रीय स्तरावर मॅरेथॉन, ट्रायथलॉन्स व सायक्लोथॉन्स आयोजित करणारी क्रीडा संयोजक संस्था चॅम्प एन्ड्युरन्स या स्पर्धेचे संयोजक आहेत.