आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉर्टिकल्चर प्रदर्शन पाहण्याची पुणेकरांना पर्वणी
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धनाशिवाय पर्याय राहिला नसल्याचे प्रतिपादन प्रभात कुमार यांनी केले. हॉर्टी प्रो इंडिया तर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉर्टिकल्चर आणि रोपवाटिकांच्या भव्य प्रदर्शनाचे उदघाटन केंद्रीय हॉर्टिकल्चर आयुक्त प्रभात कुमार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी संभाजीनगरचे मा महापौर बापू घडामोडे, महाराष्ट्र नर्सरी असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास जोगदंड, वसू इव्हेंटचे विजय रासने, वसंतराव रासने, संतोष झाबरे, शरद भांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी प्रभात कुमार म्हणाले की हॉर्टिकल्चर क्षेत्रामध्ये रोजगार आणि व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या संधी तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना तयार केल्या आहेत. या योजनांचा लाभ तरुणांनी घ्यावा असे आवाहन करतानाच प्रभात कुमार म्हणाले केंद्र सरकारने हॉर्टिकल्चर क्षेत्रामध्ये अधिकाधिक तरुणांनी व्यवसाय आणि रोजगार निर्मिती करावी. यासाठी अनेक योजना निर्माण केलेल्या आहेत. या योजनांची माहिती घेऊन तरुणांनी या क्षेत्रामध्ये व्यवसाय निर्मिती आणि त्यातून रोजगार निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन प्रभात कुमार यांनी यावेळी केले.
जोगदंड म्हणाले की वाढत्या औद्योगीकरणामुळे शहरांमध्ये झाडांचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे शहरात प्रदूषणाचे वाढते परिणाम दिसत आहे. हे परिणाम कमी करण्यासाठी शहरांमध्ये वृक्षारोपणाचे प्रमाण वाढावे. घरात, परसबागेत, गॅलरीमध्ये, हॉर्टिकल्चरला प्राधान्य द्यावे.
वसंतराव रासने म्हणाले की या उपक्रमामध्ये महाराष्ट्रातीलच नव्हे तर परदेशातील शेतकरी सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन जोडधंदा निर्माण करावा आणि त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळही निर्माण होऊ शकेल असा विश्वास वसंतराव रासने यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशिकांत धुमाळ यांनी केले तर आभार विजय रासने यांनी मानले.