अ. भा. मराठी नाट्य संमेलनात प्रथमच लहान मुलांच्या किलबिलाटाने गजबजणार “बालनगरी”
१०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, येत्या ६ व ७ जानेवारी २०२४ दरम्यान चिंचवडगाव येथील श्री मोरया गोसावी क्रीडा संकुलनावर आयोजित करण्यात आले आहे. शतकी नाट्य संमेलन असल्याने ते ऐतिहासिक व विशेष असणार यात शंका नाही. या १०० व्या नाट्य संमेलनात प्रथमच लहान मुलांसाठी बालनगरी स्वतंत्रपणे उभारण्यात आली आहे. जे आजवरच्या नाट्य संमेलनाच्या इतिहासात यापूर्वी कधीही घडले नव्हते. नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर यांनी स्वतः या बालनगरीच्या उभारणीसाठी लक्ष दिले आहे.
विशेष म्हणजे, संमेलनाच्या पूर्वसंध्येसह (दि. ५ जानेवारी) नाट्य संमेलनाच्या दोन्ही दिवसही या बालनगरीत लहान मुलांसाठी भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. बालनाट्य नगरीमधील विविध कार्यक्रमांची निवड प्रकाश पारखी, धनंजय सरदेशपांडे, रुपाली (काठोळे)पाथरे , मयूरी जेजुरीकर, गौरी लोंढे या बालनाट्य चळवळीत भरीव योगदान देणाऱ्या दिग्गजांच्या समितीने केली आहे. ही बालनगरी भोईर नगर येथील मैदानावर असणार आहे.
या विषयी माहिती देताना नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर म्हणाले, आज पर्यंत ९९ नाट्य संमेलन झाली, मात्र यामध्ये लहान मुलांसाठी एखाद दुसरं नाटक किंवा बाल गीतांचा कार्यक्रम व्हायचा. त्यामुळे नाट्य संमेलनात लहान मुलांचा सहभाग हा कमी प्रमाणात दिसायचा. परंतु १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेताना आम्ही जाणीवपूर्वक लहान मुलांसाठी ‘बालनगरी’ हा एक वेगळा रंगमंच ठेवला आहे. लहान मुलांना बालपणा पासूनच नाटकाची गोडी लागावी, त्यांच्यावर नाटकाचे संस्कार व्हावेत, हा यामागील उद्देश आहे. पूर्वसंध्येला स्थानिक बाल कलाकारांच्या विविध कार्यक्रमाबरोबरच , सुट्टी गाजवलेले ‘ बोक्या सांतबंडे’ हे व्यावसायिक बालनाट्य, ग्रीप्स थिएटर चे गोष्ट सिंपल पिल्लाची , बालगीते, पपेट शो हे खास मुलांसाठी आकर्षण असणार आहे. तसेच क्लाऊन माईम अॅक्ट हा प्रकार पिंपरी – चिंचवड मध्ये पहिल्यांदाच सादर होणार आहे.
पुढे बोलताना भाऊसाहेब भोईर म्हणाले, नाट्य संमेलन काळात बालनगरीत विविध रंगारंग कार्यक्रम असणार आहेत. हे पाहण्यासाठी आम्ही महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी, झोपडपट्टी भागात असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थी यांना आमंत्रीत केले आहे, कारण तिकीट काढून असे कार्यक्रम त्यांना अनुभवता येणार नाहीत. तसेच इतरही लहान मुलं यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत आनंद लुटतील असा विश्वास भोईर यांनी व्यक्त केला.