अहिकाचा जागतिक क्रमवारीत २६व्या स्थानावर असलेल्या लिलीला धक्का
जागतिक क्रमवारीत १३५व्या क्रमांकावर असलेल्या अहिका मुखर्जीने इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ मध्ये सोमवारी जागतिक क्रमवारीत २६व्या स्थानावर असलेल्या लिली झँगला २-१ असा झटका दिला. पुण्यातील महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ मध्ये दबंग दिल्ली टीटीसीने ११-४ अशा फरकाने यू मुंबा टीटीवर दणदणीत विजय मिळवला.
भारतीय टेबल टेनिस फेडरेशन (TTFI) च्या मान्यतेखाली नीरज बजाज आणि विटा दाणी यांनी फ्रँचायझी-आधारित लीगला प्रोत्साहन दिले आहे. २०१७ पासून सुरू झालेली लीग भारतातील टेबल टेनिससाठी गेम चेंजर ठरली आहे.
अहिकाने जबरदस्त खेळ करताना २-१ अशा फरकाने लिलीचा पराभव केला. पहिल्या गेममध्ये यू मुंबा टीटीची लिली आणि अहिका यांच्यात कडवी टक्कर पाहायला मिळाली. दोन्ही खेळाडू हार मानण्यास तयार नव्हते आणि त्यांचा खेळ दर्जेदार झाला. पण, अमेरिकेच्या लिलीने पहिला गेम गोल्डन गुणांसह ११-१० असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चुरस कायम दिसली आणि यावेळी दबंग दिल्ली टीटीसीच्या अहिकाने गोल्डन गुणाने बाजी मारून सामना १-१ असा बरोबरीत आणला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये अहिकाने अप्रतिम खेळ केला आणि ११-१० असा विजय मिळवला.
याआधी यू मुंबा टीटीच्या मानव ठक्करला दबंग दिल्ली टीटीसीच्या जॉन पेर्सनकडून ३-० असा पराभव पत्करावा लागला. मानवने पहिल्या गेममध्ये सुरुवात चांगली केली, परंतु पेर्सनने १०-२ अशी आघाडी घेत पकड मजबूत केली. मात्र, मानवने सलग सहा गुण घेत पहिला गेम जीवंत ठेवला होता, परंतु स्वीडीश खेळाडूने ११-८ अशी बाजी मारली. दुसर्या गेममध्ये सुरतच्या मानवने चांगला खेळ केला, परंतु पेर्सनच्या आक्रमक खेळासमोर त्याला जास्त काळ टिकता आले नाही. पेर्सन याने दुसरा व तिसरा गेम अनुक्रमे ११-८ व ११-७ असा जिंकला.
साथियन ज्ञानसेकरन आणि बार्बोरा बालाझोव्हा या जोडीने मिश्र दुहेरीत मानव व लिली यांच्यावर २-१ असा विजय मिळवून दबंग दिल्ली टीटीसीची आघाडी मजबूत केली. पहिल्या गेममध्ये यू मुंबा टीटीच्या जोडीने ११-५ अशा फरकाने साथियन व बार्बोरा यांच्यावर विजय मिळवला, परंतु त्यानंतर दबंग दिल्ली टीटीसीच्या खेळाडूने पुनरागमन केले आणि पुढील दोन्ही गेम ११-५, ११-८ अशा फरकाने जिंकले.
जागतिक क्रमवारीत १८व्या स्थानावर असलेल्या क्वाद्री अरुणाने साथियनचा २-१ असा पराभव केला, परंतु यू मुंबा टीटीचा पराभव टाळण्यासाठी हा विजय पुरेसा नाही ठरला. क्वाद्रीने ११-६, ११-६ असे पहिले दोन गेम जिंकले. साथियनने तिसरा गेम ११-८ असा जिंकला. शेवटच्या सामन्यात श्रीजा अकुलाने ३-० ( ११-८, ११-९, ११-८) अशा फरकाने दिया चितळेचा पराभव केला अन् दबंग दिल्ली टीटीसीचे वर्चस्व कायम राखले.
DafaNews द्वारा समर्थित इंडियन ऑइल टेबल टेनिस सीझन ४ चे सर्व सामने स्पोर्ट्स १८ आणि जिओ सिनेमावर सायंकाळी ७.३० वाजल्यापासून प्रसारित होत आहेत आणि BookMyShowवर तिकिट्स उपलब्ध आहेत.
निकाल
दबंग दिल्ली टीटीसी ११-४ यू मुंबा टीटी
जॉन पेर्सन ३-० मानव ठक्कर ( ११-८, ११-८, ११-७)
अहिका मुखर्जी २-१ लिली झँग ( १०-११, ११-१०, ११-१०)
साथियन/बार्बोरा २-१ मानव/लिली ( ५-११, ११-५, ११-८)
साथियन ज्ञानसेकरन १-२ क्वाद्री अरुणा ( ६-११, ६-११, ११-८)
श्रीजा अकुला ३-० दिया चितळे ( ११-८, ११-९, ११-८).