अहंकाराचा वारा न लागो अंगीहभप दीपक महाराज खरात यांचे विचार
” ईश्वर चरणी लीन होतांना अहंकार व मी पणाचा त्याग करावा. या दोन्ही गोष्टींमुळे प्रेम, माया, ममता आणि जिव्हाळा संपतो. भक्तीच्या वाटेवर चालतांना वारकर्यांनी अहंकाराचा वारा न लागो अंगी याचे अंगीकरण केल्यास ज्ञानेश्वर माऊलीचा आशीर्वाद लाभतो.”असे विचार संत गोरोबाकाका संस्थानचे वाड्ःमय प्रचारक ह.भ.प. दीपक महाराज खरात यांनी द्वितीय पुष्प गुंफतांना व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीसंत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’,विश्वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे संत शिरोमणी तत्त्वज्ञ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२७ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने लोकप्रबोधनपर आयोजित करण्यात आले आहेत. त्यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
तसेच सौ. उषा विश्वनाथ कराड, प्रा.स्वाती कराड चाटे, योगगुरू मारुती पाडेकर गुरूजी, डॉ. सुदाम महाराज पानेगावकर व विष्णू भिसे उपस्थित होते.
ह.भ.प. दीपक महाराज खरात म्हणाले,”अहंकार हा माणसाचा मोठा शूत्रू. प्रत्येक व्यक्तीमध्ये अहंकार असतो. कुणाला कर्तृत्वाचा, रुपाचा, ज्ञानाचा तर कुणाला पदाचा व सत्तेचा अहंकार असतो. अहंकारात अहं म्हणजे मी प्रभावी असतो. त्यामुळे भक्तीत लीन होतांना ईश्वरा ऐवजी स्वतःवर अधिक लक्ष केंद्रीत असते. माऊलींनी सांगितल्याप्रमाणे वारकर्यांनी नम्रता अंगी बाणावी. सर्वांचा आदर सन्मान करावा तेव्हाच आम्हाला आशीर्वाद प्राप्त होतो.”
त्यानंतर भागवताचार्य बालयोगी ह.भ.प. हरिहर महाराज दिवेगांवकर यांचे कीर्तन झाले. तसेच विश्वशांती संगीत कला अकादमी, येथील शिक्षक व विद्यार्थी यांचा विश्वशांती दर्शन हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम झाला.
यावेळी डॉ. विश्वनाथ कराड यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक यांचा विशेष सत्कार केला. या स्वयंसेवकांनी वारकर्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नंतर इंद्रायणी मातेची आरती झाली.
हभप शालीकराम खंदारे यांनी सूत्रसंचालन व महेश महाराज नलावडे यांनी आभार मानले.