18/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी लाखो हातांनी पुण्यात वस्त्र विणले जाणार 

Share Post

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराशी संबंधित कार्यात आपला निदान खारीचा वाटा असावा, आपलाही या कार्यास हातभार लागावा, अशी अनेक नागरिकांची इच्छा आहे, हेच लक्षात घेत श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र – अयोध्या आणि हेरीटेज हँडविविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्ट- पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दो धागे श्रीराम के लिए’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत १० ते २२ डिसेंबर दरम्यान पुण्यामधे अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी नागरिकांना वस्त्र विणण्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेता येणार आहे. या बरोबरच या १३ दिवसांमध्ये याच ठिकाणी अनेकविध, भव्य कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी आणि हेरिटेज हॅंडविविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिका अनघा घैसास व अध्यक्ष विनय पत्राळे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. अनघा घैसास यांनी संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना सांगितली. त्यांच्या गेल्या दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनी आणि आदरणीय स्वामी गोविंद देव गिरींच्या आशिर्वाद व संपूर्ण पाठींब्यानी हा कार्यक्रम पुण्यात साकार होत आहे.

१९८५ नंतर अनेक प्रकारे श्रीराम जन्मभूमीच्या कार्यात वेळो वेळी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. याच शृंखलेतील नवा अध्याय म्हणून अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी वस्त्र विणण्याचा ‘दो धागे श्रीराम के लिए’ हा अद्भुत आविष्कार पुण्यात साकारला जात आहे. भारतीय समाजातील अनेकविध जाती, पंथ, प्रांतातील नागरिक आपले आर्थिक स्तर आणि भाषिक विविधता यांच्या सीमा ओलांडून रामरायासाठी वस्त्र विणायला एकत्र येऊन जाज्वल्य राष्ट्रभक्तीचे एक उत्तम उदाहरण जगासमोर ठेवतील.

या अंतर्गत १० ते २२ डिसेंबर दरम्यान कार्यक्रमस्थळी भव्य मंडप उभारला जाईल. देशभरातील प्रत्येक राज्यांतून हातमाग इथे येईल, इतकेच नाही तर, नेपाळसह इतरही काही देशांमधून हातमाग येणार आहेत. काही महानुभावांच्या हस्ते पहिले काही धागे विणले जातील व नंतर कोणीही येऊन आपल्या श्रद्धेचे व विश्वासाचे दोन धागे या मागांवर विणू शकतील. वस्त्र विणण्याआधी नागरिकांना ते कसे विणावे याचे प्रात्यक्षिक दाखवले जाईल. आपल्याकडे वैदिक काळापासून हातमागाचे उल्लेख सापडतात. आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या हातमागकलेचा प्रसार व्हावा व पुढच्या पिढीपर्यंत ही वैभवशाली कला पोहोचावी, हा सुद्धा या कार्यक्रमाचा हेतू आहे.

संतांच्या उपस्थितीत या उपक्रमाला १० डिसेंबर रोजी विधीपूर्वक होमहवनाने सुरुवात होईल. या वेळी अनेक मान्यवर उपस्थित राहत या सेवेत सहभागी होतील. देवी देवतांची वस्त्रे कशी असावीत याबद्दल वेदांमध्ये उल्लेख आहेत. त्याच पद्धतीने हे वस्त्र देखील विणण्यात येणार आहेत.

वस्त्र विणण्यासोबतच कार्यक्रमाच्या ठिकाणी ‘श्रीरामा संबंधित’ व्याख्याने, भजन – कीर्तन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या बरोबरच श्रीराम मंदिराचा संपूर्ण इतिहास सांगणारे चित्रप्रदर्शन देखील या ठिकाणी असेल. सकाळ-संध्याकाळ महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे.

तरी सर्व रामभक्तांनी जातीपातीच्या चौकटीतून बाहेर येऊन एक भारतीय या नात्याने आपल्या श्रद्धेचे व विश्वासाचे दोन दोन धागे या वस्त्रात विणण्यासाठी यावं असं आग्रहाचे निमंत्रण करण्यात येत आहे.

यावेळी बोलताना स्वामी गोविंद देव गिरी महाराज म्हणाले, “अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी वेगवेगळ्या देशांत नागरिकांनी पैसे गोळा करून ठेवले आहेत. मात्र आजवर हा निधी न्यासाने स्वीकारला नसून आता न्यासास तीन वर्षे पूर्ण झाले असल्याने एफसीआरए अर्थात परदेशी योगदान (नियमन) कायद्या अंतर्गत आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या आहेत. त्यामुळे लवकरच आम्ही हा निधी स्वीकारू शकू. मंदिर निर्माणासाठी आजवर भारतातील नागरिकांकडून समर्पणाचा उपलब्ध झालेला निधी हा ३२०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे आणि तेवढाच निधी हा आज आमच्याकडे जमाही आहे. आता मंदिराचे काम पूर्ण होत चालले असून इतक्या लोकांनी भरभरून प्रेम दिल्याने राम मंदिराच्या निर्माण कार्यात कोणतीही अडचण येणार नाही, असा आमचा विश्वास आहे.

या उपक्रमात विणण्यात येणारे वस्त्र हे ४८ पन्हा असलेले असणार असून ते रेशमाचे असणार असल्याचे सांगत अनघा घैसास म्हणाल्या, “या अंतर्गत विणण्यात येणारे वस्त्र हे रामाच्या मूर्तीसोबतच राम मंदिर परिसरातील इतर संबंधित ३६ मूर्तींसाठी देखील वापरण्यात येणार आहे. यामध्ये राम परिवारासोबतच शबरी, जटायू व इतर मुनींच्या मूर्तींचा सहभाग आहे.”  

कार्यक्रमाचे स्थळ- सूर्यकांत काकडे फार्म, स.न. १०९, किनारा हॅाटेलजवळ, पेठकर साम्राज्यसमोर, कोथरूड, पुणे – ४११०३८