अभिनयला प्रत्येक मुलगी म्हणतेय ‘मी तुला त्या नजरेनं कधी पाहिलं नाही’
जर तुम्ही खऱ्या प्रेमाच्या शोधात असाल आणि प्रेमाच्या सायन्सचे नियम पाळले नाहीत तर कधी ना कधी प्रेमात तुमचे बांबू लागणार. काही दिवसांपूर्वी ‘बांबू’ या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. तेव्हापासूनच प्रेमात बांबू लागलेला प्रत्येक जण हा चित्रपट पाहण्यासाठी आतुर झाला आहे. या चित्रपटातील ‘मी तुला त्या नजरेने’ हे धमाल गाणे प्रदर्शित झाले असून हे गाणे रोहित राऊत आणि ज्ञानदा पवारने गायले आहे. तर सचिन पाठक यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला समीर सप्तीसकर यांनी संगीत दिले आहे.
या गाण्यात अभिनय बेर्डेच्या आयुष्यात अनेक मुली येताना दिसत असल्या तरी त्याचे खरं प्रेम त्याला मिळत नाहीये. प्रत्येक मुलगी त्याच्याकडे केवळ एका चांगल्या मित्राच्या भावनेने पाहात असल्याने प्रत्येकवेळी अभिनयच्या प्रेमाचं पुस्तक उघडण्यापूर्वीच बंद होताना दिसतेय. प्रत्येक मुलगी त्याला एकच वाक्य बोलतेय ‘मी तुला त्या नजरेने कधी पाहिलं नाही’. आता त्याची ही शोधमोहीम पूर्ण होऊन त्याला खरं प्रेम मिळणार का, हे आपल्याला २६ जानेवारीला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल.
गाण्याबद्दल दिग्दर्शक विशाल देवरूखकर म्हणतात, “हे एक जबरदस्त गाणे असून तरूणाईला आवडेल, असे आहे. या गाण्याचे बोल, संगीत अतिशय भन्नाट आहे आणि यात रोहित राऊत आणि ज्ञानदाच्या आवाजाने अधिकच रंगत आणली आहे.’’
क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन निर्मित या चित्रपटाचे निर्माते तेजस्विनी पंडित, संतोष खेर आहेत. तर या चित्रपटाचे लेखन अंबर हडप यांनी केले आहे. अभिनय बेर्डे, शिवाजी साटम, अतुल काळे, वैष्णवी कल्याणकर, पार्थ भालेराव, स्नेहल शिदम, समीर चौघुले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.