Entertainment

‘अनलॉक जिंदगी’ने घेतली खऱ्याखुऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सची दखल

Share Post

कोविडच्या काळातील भयंकर परिस्थितीचे मन स्तब्ध करणारे चित्रण प्रेक्षकांना लवकरच पडद्यावर पाहायला मिळणार आहे. राजेश गुप्ता दिग्दर्शित ‘अनलॉक जिंदगी’ हा चित्रपट येत्या १९ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून यात महामारीच्या काळात आपल्यापैकी अनेकांनी सहन केलेला त्रास, हरवत चाललेली माणुसकी, दुरावलेले नातेवाईक, प्रियजनांचा मृत्यू अशा अनेक भयाण परिस्थितींचा केलेला सामना आणि हा कधीही न विसरता येणारा प्रवास या चित्रपटात दिसणार आहे. हा काळ निश्चितच सर्वांसाठी खडतर होता, परंतु याच काळाने आपल्याला माणसांमधील माणुसकीचे दर्शन घडवले, याचा काळाने आपल्याला आपले कोण आणि परके कोण याची जाणीव करून दिली, अनेकांचे मतपरिवर्तन केले. या महामारीच्या काळात देवासारखे आपल्या मागे उभे राहिले ते फ्रंटलाईन वर्कर्स. त्यांच्या कुटुंबियांना मागे सोडून, आपल्या जीवाची पर्वा न करता हे फ्रंटलाईन वर्कर्स आपल्यासाठी दिवसरात्र झटत होते. यात पोलीस, डॉक्टर्स, नर्स, रुग्णवाहिनी चालक, सामाजिक संस्था अशा अनेकांचा सहभाग होता. या चित्रपटाच्या निमित्ताने अशाच काही फ्रंटलाईन वर्कर्सची दखल घेत, त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. ज्यांनी ही चित्रपटात दाखवलेली दृश्ये स्वतः प्रत्यक्षात अनुभवली आहेत. यात हिमांशू आणि ट्विन्कल या दाम्पत्याने या काळात अविरत ऍम्ब्युलन्स सेवा पुरवली. हिमांशू हे ‘ऍम्ब्युलन्स मॅन ऑफ इंडिया’ या नावाने तर ट्विन्कल या पहिल्या महिला रुग्णवाहिनी चालक या नावाने ओळखल्या जातात. गौरव राय यांचीही या काळात ‘ऑक्सिजनमॅन’ अशी ओळख निर्माण झाली. मलेश्वर राव यांचेही या काळातील कार्य विशेष उल्लेखनीय आहे.

दिग्दर्शक राजेश गुप्ता म्हणतात, “या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. दोन वर्षांपूर्वीचे ते भयाण वास्तव पडद्यावर दाखवण्यासाठी आम्ही भरपूर मेहनत घेतली आहे. हा चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही फ्रंटलाईन वर्कर्सच्या कार्याला आदर देत, सलाम करत आहोत. आज त्यांच्यामुळे आपण सर्व सुरक्षित राहू शकलो.”

रियल रील्स प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक राजेश गुप्ता असून या चित्रपटात पितोबाश त्रिपाठी, राजेश गुप्ता, देविका दफ्तरदार, शिवानी सुर्वे, इंदिरा कृष्णा, हेमल देव यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे लेखन आणि संवादही राजेश गुप्ता यांनीच केले असून गीतकार नुसरत फतेही अली खान, राजेश गुप्ता आहेत. ‘अनलॉक जिंदगी’ची नऊ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली असून त्यापैकी दोन महोत्सवात या चित्रपटाने पुरस्कार पटकावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *