‘अथांग’ला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद
जयंत पवार दिग्दर्शित ‘अथांग’ या वेबसीरिजचे सगळे भाग आता प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांकडून ‘अथांग’ला तुफान प्रतिसाद मिळत आहे. मल्टीस्टारर या वेबसीरिजच्या प्रत्येक भागाचा शेवट हा एका अशा वळणावर येऊन थांबतोय, जिथे पुढच्या भागात काय घडणार, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांची उत्सुकता तीव्र होत आहे. त्यामुळे अनेकांनी ‘अथांग’ बिंज वॅाच केले आहे. या सगळ्या यशाचे श्रेय ‘अथांग’च्या संपूर्ण टीमला जाते. मुळात ‘अथांग’शी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाने, मग तो पडद्यावरील असो वा पडद्यामागील असो, सगळ्यांनीच प्रामाणिक मेहनत केली आहे. निर्माती तेजस्विनी पंडितची मेहनत यापूर्वीच आपल्याला कळली आहे. पिरिओडिक सीरिज असल्याने प्रत्येक व्यक्तिरेखेने स्वतःमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल केले आहेत. त्यापैकीच एक धैर्य घोलप. धैर्यने रावसाहेब साकारण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. फिटनेट कॅान्शस असलेला धैर्य ‘राऊ’साठी दिवसातून दोन वेळा दोन तास व्यायाम करायचा. तेही सलग तीन महिने.
‘राऊ’साठी केलेला शारीरिक आणि मानसिक बदल धैर्यने शेअर केला आहे. तो म्हणतो, ‘’ तेजस्विनी माझी खूप चांगली मैत्रीण आहे, मात्र ‘रावसाहेब’च्या भूमिकेसाठी तिने माझी रितसर ऑडिशन घेतली. माझा अभिनय तिला आवडला पण शारीरिक बदल करावे लागणार होते. कारण दिग्दर्शकांना पिळदार शरीरयष्टीचा ‘रावसाहेब’ नको होता. अखेर निलेश मोरे यांच्या सहकार्याने मी माझ्यात अनेक शारीरिक बदल केले. या काळात माझे एका दुसऱ्या प्रोजेक्टचेही काम सुरू होते. त्याची शिफ्ट सात ते सात होती. त्यामुळे सकाळी सातच्या आधी दोन तास आणि सातच्या नंतर दोन तास माझा व्यायाम चालायचा. मानसिक बदल असा की, राऊ मितभाषी आहे आणि मी खूप बोलका आहे. माझ्या चेहऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया पटकन येते, जिथे राऊ त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव व्यक्तच करत नाही. मुळात माझी नजर खूप भिरभिरणारी आहे आणि राऊची स्थिर. त्यामुळे हे जरा आव्हानात्मक होते परंतु यावरही मात केली. हे सगळे करताना मला संपूर्ण टीमचे सहकार्य लाभले.’’
प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘’ इतक्या प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळणारी प्लॅनेट मराठी ओटीटीवरील ही पहिली वेबसीरिज आहे. प्रेक्षकांना ‘अथांग’ आवडतेय, ही आम्हाला सुखावणारी गोष्ट आहे. विषय, आशय उत्तम आहे, हे आम्हाला माहितच होते, प्रेक्षकांनाही आवडेल, याची खात्री होती. तरीही मनात कुठेतरी प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याची उत्सुकता असते, प्रेक्षक ‘अथांग’ला कसे स्विकारतील, याची. आत्ताचे चित्र पाहता ‘अथांग’ अधिकच विस्तारतोय.’’
प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन निर्मित, अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत ‘अथांग’चे तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्माते आहेत. या वेबसीरिजमध्ये संदीप खरे, निवेदिता जोशी- सराफ, धैर्य घोलप, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चौक आणि रसिका वखारकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.