अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे गरजवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत
गेली दोनशे वर्षे विद्यार्थ्यांना एकच शिक्षणपद्धतीने शिक्षण दिले जात आहे. चांगले गुण मिळाले की विज्ञान शाखेला प्रवेश घ्यायचा, हे जवळजवळ सगळेच करतात. परंतु प्रत्येकजण हा इंजिनियर, डॉक्टर किंवा कलेक्टर होऊ शकत नाही. देशात शिक्षणासाठी इतका खर्च केला जातो. परंतु विमानापासून ते टाचणी पर्यंतचा शोध आपल्या देशातील विद्यार्थांनी लावला नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय वयातच कौशल्यापूर्ण शिक्षण दिले पाहिजे. देशाबाहेर जाऊन नोकरी करणारे नाही तर देशात रोजगार निर्माण करणारे विद्यार्थी घडले पाहिजेत, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले.अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे गरजवंत विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत प्रदान कार्यक्रमाचे आयोजन सदाशिव पेठेतील श्री गोपाळ हायस्कूल शाळेत करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अ.ल.देशमुख, आमदार रविंद्र धंगेकर, उद्योजक तुषार तुपे, सुलभ शिक्षण मंडळ संस्थेच्या उमा बोडस, मुख्याध्यापिका तेजस्विनी रजपूत, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सुर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव आदी उपस्थित होते. ट्रस्टचे सहाय्यक उद्योजक प्रकाश धारिवाल यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. गिरीश प्रभुणे म्हणाले, बीजमाता राहीबाई पोपरे बाईंसारख्या न शिकलेल्या बाईंनी बीयांमध्ये संशोधन करून देशी बीयांची बँक सुरू केली. जगाने तोंडात बोट घालावे, असे ज्ञान आपल्या देशातील लोकांकडे होते. फक्त पुस्तक वाचल्याने ज्ञान मिळत नाही तर ते प्रत्यक्ष सुद्धा देता आले पाहिजे. विद्यार्थी बारावीच्या वर्गात गेला तरी त्याच्याकडे नविन काहीच कौशल्य नसते. ते त्यांना शालेय वयातच दिले पाहिजे, असे ही त्यांनी सांगितले. डॉ.अ.ल.देशमुख म्हणाले, समाजात एकाबाजूला अत्यंत नकारात्मक घटना घडत असताना दुस-या बाजूला गणपती मंडळांसारखे घटक सकारात्मक कामे करीत आहेत. अशी मंडळे समाजबांधणीची आणि समाज टिकविण्याचे काम करतात. विद्यार्थांना वह्या वाटप करून, शिक्षणासाठी मदत करून त्यांना शिकण्यासाठी प्रवृत्त करतात, असेही त्यांनी सांगितले. रविंद्र धंगेकर म्हणाले, सामाजासाठी काम करणा-या प्रत्येक व्यक्तीची समाज नोंद घेत असतो, याचे प्रत्यक्ष उदाहरण मी आहे. त्यामुळे जमेल तसे समाजासाठी काम करत राहावे, असेही त्यांनी सांगितले. निवृत्ती जाधव म्हणाल, गरीब घरात मुलांच्या शिक्षणासाठी किती आर्थिक अडचणी येतात. याचा अनुभव मी माझ्या लहान वयात घेतला आहे. याची जाणिव ठेवूनच गरजू घरातील विद्यार्थांना मदत करून शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचे काम ट्रस्टच्यावतीने करीत आहे, असेही त्यांनी सांगितले. जतिन पांडे यांनी सूत्रसंचालन केले.